छत्रपती संभाजीनगर: मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण
छत्रपती संभाजीनगर :-मतदान यंत्रे हे पूर्णतः सुरक्षित असून या यंत्रांच्या यादृच्छिकीकरणाद्वारे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता जोपासली जाते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
‘लोकसभा निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने जिल्ह्यात घ्यावयाच्या मतदानासाठी मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे व कंट्रोल युनिट यांचे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरु आहे. मतदान नोंदविण्यासाठी वापरण्यात येणारे मतदान यंत्र, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांच्या यादृच्छिकीकरणाची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. आज हे प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महावितरणचे सहा. कार्यकारी संचालक राहुल गुप्ता, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी रामदास दौंड तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांना यादृच्छिकीकरण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली. ही सर्व प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. यादृच्छिकीकरण प्रक्रियेत जिल्ह्यात सध्या प्रथमस्तरीय चाचणी झालेले व त्यात सुस्थितीत असणारे मतदान यंत्र, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र यांचे क्रमांकनिहाय यादी असते. विधानसभा मतदारसंघनिहाय यादृच्छिकीकरण करुन या यादीतील यंत्रांची नोंद केली जाते. त्यानुसार त्या क्रमांकाची यंत्रे ही त्या त्या विधानसभा मतदारसंघात पाठविली जातात. आता दि.१६ पर्यंत ही यंत्रे विशेष वाहनांद्वारे त्या त्या विधानसभा मतदारसंघात पाठविली जातील. या प्रक्रियेलाही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहू शकतात.
त्यानंतर मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या गोडावून मध्ये सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसह जाऊन मतदान यंत्रे त्यांच्यावरील क्रमांकासह दाखविण्यात आली व त्यांच्या यादृच्छिकीकरणानुसार वर्गीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या टप्प्यानंतर पुन्हा यादृच्छिकीकरण केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यात ७२३६ मतदान यंत्रे, ४२६५ कंट्रोल युनिट, ४४११ व्हीव्हीपॅट यंत्र आहेत. ही संख्या राखीव यंत्रांसह आहे. जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.