नांदेड :- -नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती करण्यात आली. लोकसभा संदर्भिका नांदेडच्या माध्यमातून 1951 ते 2019 पर्यतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अनुषंगिक संपर्काची माहिती माध्यमांना मिळणार आहे. या संदर्भिकेचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी संदर्भिका नांदेडचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, विविध माध्यमाचे प्रतिनिधी आदीची उपस्थिती होती.
नांदेड संदर्भिकेत मतदार संघ नकाशा, निवडणूक आचारसंहितेत काय करावे याबाबतची पूर्ण माहिती, प्रमुख माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, माध्यम कक्ष, नांदेड, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, (व्हीव्हीपॅट) भारत निवडणूक आयोग संपर्क, प्रमुख संपर्क अधिकारी, विविध कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , नांदेड जिल्ह्यातील मतदार संख्या, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र व अंतर्गत तहसिल व महसुली क्षेत्र, 1951 ते 2019 पर्यंतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल, महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम, नांदेड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024, नांदेड मिडीया सेंटर, तक्रार निवारण केंद्र याबाबतची माहिती या संदर्भिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच निवडणुकीतील जबाबदाऱ्यासोबत होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कक्ष व त्यांचे क्रमांक याची यादी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.