MH 13News Network
सोलापूर महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे चौक या ठिकाणी नागरिकांसाठी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या उदात्त धोरणासाठी दोन चेंबर, दोन वॉल्व्ह, रस्त्याच्या डाव्या बाजूला पण रस्त्याच्या वरच्या बाजूला ठळक दिसतील अशा पद्धतीने बांधण्यात आले आहेत.. त्यात काय नवल…!
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी राजे चौक यांना जोडणारा रस्ता निर्माण करण्यात आला आहे. जवळपास सव्वा दोन कोटी रुपये या रस्त्यावर खर्च करण्यात आल्याची माहिती डिजिटल बोर्ड लावून राजकीय पुढाऱ्यांनी दिलेली होती. विशेष म्हणजे याच रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यापेक्षा जास्त उंचीवर हे दोन चेंबर ,दोन वॉल्व्ह बांधण्यात आले आहेत. आणि असेच मोकळे सोडले आहेत.ना त्यावर कोणत्याही प्रकारचे झाकण किंवा पादचारी किंवा वाहनांसाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही..
आज शनिवारी सायंकाळी साधारण साडेचारच्या सुमारास एक चार चाकी वाहन या चेंबरमध्ये अडकले आणि पुन्हा हा रस्ता,येथील काम,हे चेंबर,वॉल्व्ह, आणि महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांची कार्य कुशलता चर्चेमध्ये आली आहे.
ही गाडी येथून बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे नागरिक, जवळ असलेले दुकानदार, प्रयत्न करत आहेत.
आता रस्त्याच्या वर आलेले हे चेंबर बुजवण्यासाठी पुन्हा प्रशासन किंवा मक्तेदार खर्च करणार की त्यासाठी टेंडर काढणार अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.