MH 13 NEWS NETWORK
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 करिता 27 – मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार आहेत. यातील पहिली तपासणी उद्या, गुरुवार 09 मे 2024 रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च हा त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. तपासणीचे ठिकाण– निवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ, अर्थ व सांख्यिकी सभागृह, प्रशासकीय इमारत, आठवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई– 400051.
तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (इनव्हाईस, जीएसटी क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/बॅंक विवरणपत्र, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.