MH 13 NEWS NETWORK
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४: अमरावतीत मतदानासाठी यंत्रणा सज्ज
अमरावती – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते
07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. तर दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. 37 उमेदवार रिंगणात आहेत.अमरावती मतदार संघाची निवडणुक दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या, शुक्रवार दि. 26 रोजी मतदान होणार असून आयोगाने मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठरवून दिलेली आहे. तर दि. 4 जून रोजी मतमोजणी असून आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
1 हजार 983 मतदान केंद्रे
07- अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदार 9 लाख 44 हजार 213, महिला मतदार 8 लाख 91 हजार 780 तर ट्रॉसजेंडर मतदार 85 असे एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत.
मतदान पथकांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था
मतदान पथके नेमुन दिलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना होणार असून मतदान पथकांचे परिवहन व्यवस्थेकरीता एस.टी महामंडळाची 227 बसेस, ट्रक 22, दुर्गम भागाकरीता क्रुझर 72, मिनी बसेस 20 व जीप 84 वापरण्यात येणार आहेत.
ओळखीसाठी 12 पुरावे ग्राह्य
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदानाच्या दिवशी सुट्टी
प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे याकरिता शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. ही सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींनाही लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता, येईल असेही शासनाने जाहीर केले आहे.
पुरेसा बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत आवश्यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्यात आला असून संवेदनशील मतदान केंद्राचे ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या व केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या जादा तुकड्यांची कुमक मागविण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदार संघात शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीकरीता मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारामुळे मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार दि. 26 एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.
विशेष उपक्रम
जिल्हयात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व यंग एम्प्लॉयीज मतदान केंद्र याप्रमाणे प्रत्येकी 6 महिला, दिव्यांग व एम्प्लॉयीज मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तसेच बडनेरा मतदार संघातील मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा, जूनी वस्ती बडनेरा येथे रेन्बो मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरीता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम ॲपद्वारे व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांग व वयोवृद्धांसाठी गृहमतदान
भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी 12 डी नमुना भरून देणे आवश्यक होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जानुसार 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली होती. त्यापैकी 1 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 922 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 182 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला.
993 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील 993 मतदान केंद्राचे वेब कास्टींग करण्यात येणार आहे. तसेच वेब कास्टींग मॉनिटरींग करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षक नेमण्यात आले आहेत.
वोटर हेल्पलाईन ॲप सुविधा
मतदारांच्या सोयीसाठी व त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप्स तयार करण्यात आले असून क्यूआर कोड सुद्धा जाहिर करण्यात आला आहे. तसेच https://electoralsearch.eci.gov.in या लिंकवरुन सुद्धा त्यांचे नाव मतदार यादीत असल्याबाबतची खात्री करुन घेता येईल.