MH 13 NEWS NETWORK
मतदार जागृतीसाठी मुरुड येथील रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; चित्ररथ, पोवाडा, पथनाट्यासह विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरूषांच्या वेशभूषा
लातूर : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तुलनेने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या संकल्पनेतून प्रभावी मतदार जागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुरूड (ता. लातूर) येथे मतदार जागृतीसाठी प्रशासनाने रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मतदार जागृतीच्या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका व आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.
फेरीमध्ये गावातील शाळांच्या पुढाकाराने चित्ररथ तयार करण्यात आले होते. चित्ररथातून विद्यार्थ्यानी महापुरूषांच्या वेशभूषा साकारात व हातातील फलकांवरील स्लोगनद्वारे मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे यांनी मतदारांना आवाहन करताना मतदारांसोबत संवाद साधत सेल्फीही घेतल्या.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मतदार जागृतीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत तुलनेने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या परिसरात मतदार जागृती करण्यात येत आहे. याची सुरुवात लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रवेशद्वार असलेल्या मुरूड येथून करण्यात आली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
जनता विद्यामंदिरमध्ये सकाळी सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध क्षेत्रात कार्य करणारे नागरिक, आशा कार्यकर्ती, माजी सैनिक संघटना, गणेश मंडळे, व्यापारी संघटना अशा विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक एकत्र आले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आयरे यांनी सदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्व सांगून लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर मी मतदान करणार, तुम्हीही करा, या शिर्षकाखालील फलकावर स्वाक्षरी केली. नगर प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी मतदानाची शपथ दिली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरवात झाली.
मुख्य रस्त्याने ही रॅली निघाली. छत्रपती शिवाजी चौकात दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदिपान जगदाळे व त्यांच्या पथकाने मतदान जागृतीवरील पोवाडा सादर केला. कलाकारांनी पथनाट्य व भारूड सादर केले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. माजी सैनिकांनी गणवेशातून फेरीत सहभाग दिला. मुख्य रस्त्याने जनजागृती करून रॅली परत जनता विद्यामंदीर आली व तिथे रॅलीचा समारोप झाला. तहसीलदार मंजुषा भगत, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार श्रावण उगले, गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव, मंगेश सुवर्णकार, महादेव बन, दिलीप शिंदे, श्री. स्वामी, ग्रामविकास श्री. दुधाटे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. म्हेत्रे, विजय माळाळे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुरूडमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मानवी साखळीतून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.