मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी स्वीप अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला
.
या कार्यक्रमात एसएनडीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींद्वारे मतदान जनजागृतीसाठी पोवाडा सादर करण्यात आला. या पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी निवडणुकीत मतदानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. या निवडणुकीत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील मतदारांना या पोवाड्याच्या माध्यमातून केले. धनश्री काशिद, ज्ञानेश्वरी दळवी व अनुश्री वैद्य या विद्यार्थिनींनी हा पोवाडा सादर केला. यावेळी विद्यापीठाच्या प्राचार्या डॉ. जसवंती वाम्बुरकर व प्राध्यापक चित्रा लेले उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्ह्यात ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती तसेच पथनाट्य स्पर्धांसह प्रभातफेरी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘स्वीप’च्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृतीसाठी मदत होणार आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा ‘स्वीप’चा मूळ उद्देश आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केला.
‘स्वीप’च्या कामाचा आवाका पाहता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. सर्व कार्यालयांनी विशेषतः शाळा, महाविद्यालयांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. मतदानावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, स्विपच्या मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी व्यक्त केला आहे.
कुलाबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ‘स्वीप’तर्फे सीमा खान, शरयू लाड, उर्मिला तांबे, मधुकर वाडीकर, प्रकाश कापसे, समीर मोहिते, लहू चौगुले उपस्थित होते. सीमा खान यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्व व मतदान करण्याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी १८७ – कुलाबा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदेश डफळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.