निवडणूक निर्भय, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी परस्परात समन्वय ठेवावा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
सोलापूर,:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक करण्यासाठी सुचित करण्यात आलेले आहे. तरी जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, आपले राज्य सर्व क्षेत्रात देश पातळीवर अग्रेसर आहे. परंतू मतदानाच्या टक्केवारीत इतर राज्याच्या तुलनेत व राष्ट्रीय सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी आहे. तरी सर्व यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. मतदानाची टक्केवारी जास्त होणाऱ्या मतदान केंद्रासाठी स्पर्धा ठेवावी. मतदान केंद्रावर मतदारासाठी वेटिंग रूम करून टोकन सिस्टीमप्रमाणे मतदानासाठी बोलवावे मतदानाच्या जवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सूचित केले.
जीएसटी, उत्पादन शुल्क व वन विभागाने त्यांच्या स्तरावरून चेक पोस्ट तयार करून वाहनांची कसून चौकशी करावी. एस एस टी व एफ एस टी टीमने प्रत्येक वाहनांची व्यवस्थित तपासणी करून कॅश व अवैध दारू वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवावी. सिव्हिजनवरील तक्रारींचा निपटारा वेळेत करावा. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. खर्च समितीने उमेदवाराच्या खर्चावर व्यवस्थित नियंत्रण ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ईव्हीएम वर व्यवस्थित नियंत्रण राहील याची दक्षता घ्यावी. हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने ईव्हीएम मशीन संबंधी सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पार पाडावी, अशा सूचना श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.
मतदार यादीत जिल्ह्यातील कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव समावेश करण्याचे राहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. क्यू लेस वोटिंग प्रक्रिया राबवावी सर्व सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण व्यवस्थितपणे घ्यावे. ईपिक कार्ड चे वितरण व्यवस्थित करावे. भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने डमी बॅलेट युनिट वापरण्याचा अधिकार उमेदवारांना आहे त्याबाबत राजकीय पक्ष व माध्यमाना माहिती द्यावी. पोलीस विभागाने शहरी व ग्रामीण भागातील सर्व मतदान केंद्रावर तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने आवश्यक तो बंदोबस्त उपलब्ध करून त्याचे सूक्ष्म आराखडा करावा. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाची तयारी व्यवस्थित झालेली असून याच पद्धतीने पुढेही काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या झालेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे बैठकीत सादर केली. निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यात निवडणूक विभागाचे विविध प्रशासकीय यंत्रणा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्र यासाठी देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या बंदोबस्ताची माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हा नियंत्रण कक्ष व मतमोजणी केंद्राला भेट
जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ई व्हि एम मशीन ठेवणे व सोलापूर, माढा लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.
तसेच नियोजन भवन येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षालाही श्री. चोक्कलिंगम यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून निवडणूक विषयक करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.