येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार६४१ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत.
2004 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली होती. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात सर्वाधिक मतदान केंद्रे तर सिंधुदुर्गात सर्वांत कमी
यावेळी सर्वांत जास्त 8 हजार 382 मतदान केंद्रे पुण्यात आहेत. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380, ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रांची संख्या सिंधुदुर्गात 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 आहे.
7 जिल्ह्यांत 3 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे
7 जिल्ह्यांमध्ये 3 पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत. अहमदनगर 3 हजार 734,सोलापूर 3 हजार 617, जळगाव 3 हजार 582, कोल्हापूर 3 हजार 368, औरंगाबाद 3 हजार 085, नांदेड 3 हजार 047 आणि साताऱ्यामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्रे असतील.
10 जिल्ह्यांत 2 हजारांहून अधिक मतदान केंद्रे
2 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्ह्यांत आहेत. रायगड 2 हजार 719, अमरावती 2 हजार 672, यवतमाळ 2 हजार 532, मुंबई शहर 2 हजार 517, सांगली 2 हजार 448, बीड 2 हजार 355, बुलढाणा 2 हजार 266, पालघर 2 हजार 263, लातूर 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्रे असतील.
2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.
मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.