MH 13News Network
‘रामा’ ला दिली प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट
आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंझावती दौरा
जो रामको लायें हैं हम उनको लायेंगे, जय श्रीराम म्हणत नागरिकांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे गावागावात जंगी स्वागत केले. यत्नाळ येथे गावकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांना प्रभू श्रीरामचंद्रांची आकर्षक मूर्ती भेट देऊन जणू जनमताचा कौलच सांगितला.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावाती दौरा सुरू केला आहे. सकाळच्या सत्रात त्यांनी यत्नाळ, होटगी, होटगी स्टेशन, हिपळे, इंगळगी आदी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावागावांमध्ये आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या कडकडाटात नागरिकांनी जल्लोष केला. आपकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते.
आमदार सुभाष देशमुख म्हणाले, विकास न करणाऱ्या काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही. भाजपने होटगी परिसरात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, पाच कोटी रुपये खर्चून पर्यटन केंद्र, रस्ते अशा अनेक विषयांवर काम सुरू ठेवले आहे. आसरा चौक ते शिरवळपर्यंत मोठा रस्ता विकसित करण्याचा मानस आहे. एक एक गावातील विकास कामावर आम्ही एक एक तास बोलू शकतो. भविष्यात राम सातपुते एनटीपीसीच्याही भोंगळ कारभारात सुधारणा करतील. भविष्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत. परंतु काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने कोणतेही काम न केल्याचा आरोप केला जातो. मात्र जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल.
आमदार राम सातपुते म्हणाले, महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी निधी देण्यात आला. उज्वला गॅस योजना, शौचालय, प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अशा योजना या काळात राबवण्यात आल्या. सबका साथ सबका विकास म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांचा विकास केला आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व सक्षम असल्याचे देशाचे मत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी खंबीरपणे मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.
यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, अण्णाप्पा बाराचारे, महिला मोर्चा अध्यक्षा अंबिका पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष आप्पासाहेब मोटे, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सरचिटणीस अतुल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.