MH 13 NEWS NETWORK
मुंबई उपनगर : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची निवडणूक मुक्त व निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी केले.
वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील किमान 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि अपर जिल्हाधिकारी तथा ‘स्वीप’ चे मुख्य नोडल अधिकारी किरण महाजन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सहकारी संस्था सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा ‘स्वीप’चे मुख्य समन्वयक डॉ. महाजन, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (2) पूर्व उपनगरचे श्री. दहिभाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (3) पश्चिम उपनगरचे श्री. वीर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (4), मुंबई, स्वीपच्या आयकॉन ॲड. अश्विनी बोरुडे, डॉ. मृण्मयी भजक, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.