MH 13 NEWS NETWORK
मुंबई उपनगर,: मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतला. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक धनंजयसिंह भदोरिया, संजयकुमार खत्री, स्तुती चरण, परवीनकुमार थिंड, केंद्रीय पोलिस निरीक्षक गौरव शर्मा, प्रीती प्रियदर्शनी, केंद्रीय खर्च निरीक्षक नेहा चौधरी, दीपेंद्रकुमार, राजकुमार चंदन, किरण छत्रपती, सुनील यादव, सुरजकुमार गुप्ता, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे, वंदना सूर्यवंशी, डॉ दादाराव दातकर, सोनाली मुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.
वाहने तपासणी व फिनटेक आर्थिक व्यवहारांवर करडी नजर
विविध तपासणी पथकांच्या माध्यमातून वाहनांची तसेच फिनटेक माध्यमातून होणाऱ्या पैश्यांच्या व्यवहारांचीही कसून तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विविध ठिकाणी नाकेबंदी वाढविण्यात येत असल्याचे पोलिस सहआयुक्त श्री. चौधरी यांनी सांगितले.
निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा
मतदान केंद्रे, टोल फ्री क्रमांक, मतदारांसाठीच्या सुविधा, कर्मचारी प्रशिक्षण, वेल्फेअर ऑफिसर, आदर्श आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, कायदा – सुव्यवस्था, खर्च संनियंत्रण, मतदार जागृती अभियान (स्वीप), जाहिरात प्रमाणीकरण, आपत्कालीन परिस्थितीतील नियोजन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.
तयारी संदर्भात निरीक्षक समाधानी
मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.