MH 13 NEWS NETWORK
बीड – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या, गुरुवार दि. १८ एप्रिल पासून सुरु होत आहे.
गुरूवार 18 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून दि. 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र नि:शुल्क दिले जातील. तसेच संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.
नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याची अंतिम वेळ दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे. फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.
नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी ₹12,500 /- तर सामान्य वर्गातील उमेदवारासाठी ₹ 25000/- इतकी अनामत रक्कम आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल रोजी सायंकाळी ३ वाजेपर्यंत आहे. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहेत. 29 एप्रिल रोजी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
उमेदवार त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या वेब पोर्टलवरही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.