लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
धुळे,: धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी आज दि.13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान साहित्य, ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. 12 रोजी करण्यात आले. दुपार नंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना झाले. आज सोमवार दि. 13 रोजी सकाळी 7 वाजेपासून जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात 703 मतदान केंद्र
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात 370 तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात 333 असे दोन्ही मिळून 703 मतदार केंद्र आहेत. दोन्ही मतदार संघात प्रत्येकी एक मतदान केंद्र क्रिटीकल आहे. त्याठिकाणी आवश्यक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच साक्री विधानसभा मतदार संघात 6 तर शिरपूर विधानसभा मतदार संघात 10 मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत. याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दोन्ही मतदारसंघात 6 लक्ष 90 हजार 773 मतदार
धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकूण 6 लक्ष 90 हजार 773 मतदार आहेत. त्यात साक्री विधानसभा मतदार संघात 1 लाख 83 हजार 833 पुरुष मतदार तर 1 लाख 73 हजार 146 महिला मतदार व 6 तृतीयपंथी तसेच 341 सर्व्हिस व्होटर आहेत. तर शिरपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 70 हजार 267 पुरुष मतदार तर 1 लाख 63 हजार 512 महिला मतदार व 9 तृतीयपंथी तसेच 233 सर्व्हिस व्होटर मतदार आहेत. साक्री तालुक्यात 1 हजार 952 दिव्यांग मतदार असून शिरपूर तालुक्यात 2 हजार 166 दिव्यांग मतदार आहेत. या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध आहे.
मतदान केंद्रांवर मोबाईलला बंदी
साक्री आणि शिरपूर या दोन्ही मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.
सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र
जिल्ह्यातील या दोन्ही विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या 703 मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे
01-नंदूरबार लोकसभा मतदार संघातील साक्री व शिरपूर विधानसभा मतदार संघात आज दि. 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.