स्थानिक कलाकारांचा समावेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातच चित्रीकरण
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून या लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावला पाहिजे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप मोहिमेअंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक आदिवासी कलाकारांचा समावेश असलेला आणि संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या ‘चुनाव’ या लघुपटाच्या माध्यमातून जीवती तालुक्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम अशा जीवती व गोंडपिपरी तालुक्यातील स्थानिक आदिवासी समाजाला सोबत घेऊन जीवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला ‘चुनाव’ हा लघुपट सध्या मतदार जनजागृतीसाठी गावोगावी सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात येत आहे. दुर्गम भागातील लोकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम जीवती तहसीलतर्फे राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जीवती, शेनगाव, पुडीयाल मोहदा, भोलापठार, महाराजगुडा, परमडोली या व इतर गांवामध्येसुध्दा सदर लघुपट दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांचा सहभाग आणि आपल्याच जिल्ह्यातील चित्रीकरण असल्यामुळे या लघुपटाचे लोकांमध्ये आकर्षण आहे. मतदान करण्याची इच्छाशक्ती जागृत करणे, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
लोकशाहीमध्ये निवडणुकीचे महत्व तसेच आदिवासी संस्कृतीचे उत्तम सादरीकरण या लघुपटातून करण्यात आले आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे, असा संदेश यातून देण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन जीवती तालुक्याचे परिविक्षाधीन तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे. छायाचित्रण -अजय घाडगे, ध्वनी -अजिंक्य जुमले, संकलन -अथर्व मुळे, संगीत -तन्मय संचेती, सहायक दिग्दर्शन -सुरज वामन, कॅमेरा सहाय्यक -प्रणय भोयर व निर्मिती व्यवस्थापन -विराज टकले यांनी केले आहे
यामध्ये मुख्य भूमिका दिव्या राऊत, नानाजी कवाडे, गजानन रंगारी, सुवर्णा खर्डे, पोसुबाई कोडापे, लक्ष्मीबाई मडावी, झाडू मडावी, सोनेराव कुंभारे, मारुबाई कोडापे, कानुबाई मडावी आणि कान्हळगाव व कोलमगुडा येथील गावकऱ्यांनी केली आहे.