MH 13News Network
भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा
सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी पाठींबा जाहीर केला.
याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील, भाजपा अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, परमेश्वर यादवाड, महादेव मुडवे, बाबुराव कोडते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर जिल्हा सेवा संघाची कार्यकारिणी बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत सर्वानुमते भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्यानिमित्ताने अनेक तरूण सोलापुरातून पुण्यात येतात. त्यांना मदत करण्याचे काम सोलापूर जिल्हा सेवा संघाकडून करण्यात येते. अशा सर्व तरूणांना भेटून, फोनवरून त्यांना भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे सोलापूर जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष महेश बारसावडे यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा सेवा संघाने पाठींबा दिल्यामुळे भाजपाची ताकद सोलापूर लोकसभा क्षेत्रात वाढली आहे.
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र अगावणे, सचिव शिवानंद जाधव, कार्यकारी सभासद श्रीकांत चव्हाण, माणिक सुभेदार, पंढरीनाथ आयाचित, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.