छत्रपतींच्या घराण्यातील कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श
डोळ्यासमोर ठेऊन संस्कारी जीवन जगा ; डॉ. शिवरत्न शेटे
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये ज्या कर्तुत्वान स्त्रिया पुढे आल्या ,त्यांचा आदर्श घेऊन आणि डोळ्यासमोर ठेऊन आपण सर्वांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक आणि संस्कारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी वाजता दमानी नगर भागातील आप्पाराव बुवा सवाळकर उद्यानात डॉ. शिवरत्न शेटे यांचे ” चला संस्कार जपू या ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते, यावेळी डॉ. शेटे बोलत होते.
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत ,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी . के. देशमुख,शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, उद्योजक महेश भंडारी हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते. यावेळी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दररोज पुष्पहार घालून परिसराची स्वच्छता करणारे शिवप्रेमी प्रकाश ननवरे,सचिन चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. हेमंत पिंगळे यांनी प्रास्ताविकात ” चला संस्कार जपू या ” या विषयावरील व्याख्यानाची पार्श्वभूमी विशद केली.
डॉ. शेटे यावेळी बोलताना म्हणाले,जगातली यशस्वी स्त्री म्हणून राजमाता जिजाऊ यांच्याकडे पाहिले जाते. लखोजीराव जाधवांची आदर्श कन्या, शहाजीराजांची एक संस्कारक्षम पत्नी ,छत्रपती शिवरायांची लाडकी माता आणि शंभू बाळाची माया करणारी आजी ,अशा चारही भूमिका जिजाऊंनी यशस्वीपणे निभावल्या आहेत . राष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा संसार करण्यासाठी जिजाऊ बंगळूरातून पुण्यात आल्या . राजमाता जिजाऊपासून त्यागाच्या परंपरेला सुरुवात झाली. सामान्य रयत आणि हिंदवी स्वराज्यासाठी जिजाऊंनी आयुष्याची होळी केली. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग कधीही विसरू शकत नाही . जिजाऊंचा त्याग फार मोठा आहे. त्यांच्याकडील सकारात्मक दृष्टिकोन आपण शिकला पाहिजे.
संभाजी राजांची पत्नी येसूबाईंचा सुद्धा तितकाच त्याग आहे . संभाजी राजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील एकेक किल्ले घ्यायला सुरुवात केली. जुल्फीकार खानाने वेडा दिला . रायगड वेढला गेला. अशावेळी धाडसी निर्णय घेण्याची वेळ होती . आणि त्याचवेळी येसूबाईंनी छत्रपती म्हणून राजारामांना घोषित केलं . राजाराम निसटले, त्यानंतर येसूबाईंनी शरण जायचं नाही ,परंतु किल्ला लढवत राहण्याची भूमिका घेतली . हिंदवी स्वराज्यासाठी किल्ला पडला. येसूबाई तब्बल २९ वर्षे बाल शिवाजींसह औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या . मोगलांच्या कैदेत असताना येसूबाईंच्या मनात आत्महत्येचा विचार आला नसेल काय ? परंतु स्वराज्यासाठीचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता . म्हणून त्या जगल्या . यासाठी अशा राजघरां ण्यांकडून सकारात्मकता शिकण्यासारखे आहे, असेही डॉ. शेटे यांनी सांगितले.
. ताराराणींचे आयुष्य सुद्धा दुःखाने भरलेले आहे. राजारामांचं निधन झाल्यानंतर सुद्धा ताराराणी डगमगल्या नाहीत . अशा परिस्थितीत औरंगजेबाने संपूर्ण साताऱ्याला वेढा टाकला होता . तो महाराष्ट्रात ठाण मांडून होता. पाच लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आलाय. ताराराणी पदर खोचून रणांगणात उतरल्या . छत्रपती शिवरायांच्या या सुनेने महाराष्ट्र पोरका होऊ दिला नाही. औरंगजेबाला त्यांनी जेरीस आणले होते. औरंगजेब हतबल झाला . छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा सुनबाई ताराराणींनी वापरला आणि जोरदार मुसंडी मारली . ताराराणी प्रतिकार करत राहिल्यामुळे या पाठशिवनीच्या खेळामुळे मोगल परेशान झाले . औरंगजेबाचे मनोबल खच्ची करण्यासाठी त्याच्या मुलखात सुद्धा स्वारी केली होती आणि हे तर ताराराणी यांचे खूपच मोठे धाडस होते. जिजाऊ, येसूबाई आणि ताराराणी या राजघराण्यातील तीन स्त्रियांनी लढाई कायम ठेवत स्त्रीशक्तीचेच दर्शन घडवले आहे.
दरम्यान हीच परंपरा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी चालवली . अहिल्यादेवी इंदूरची राणी झाली . पुण्यात विवाह झाला . संसार उत्तमरीत्या सुरू होता. आनंदाने संसार सुरू असतानाच तोफेच्या गोळ्याने पती खंडेराव यांचा मृत्यू झाला . अहिल्यादेवींचे कुंकू हिरावून घेतले. दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असताना सुद्धा अहिल्यादेवी होळकर डगमगल्या नाहीत . त्यानंतर सासू सासरे पुत्र नातू आणि जावयाचा सुद्धा मृत्यू झाला आणि मुलगी सुद्धा सती गेली. एकापाठोपाठ एक असे सात धक्के बसले. परंतु कधीही अहिल्यादेवींच्या मनाला आत्महत्येसारखा विचारसुद्धा शिवला नाही. एखादा जिवलग माणूस गेल्यानंतर माणसाच्या आयुष्यात रस राहत नाही . वेगवेगळे वाईट विचार मनामध्ये येतात . कुटुंबातील सात जणांचे मृत्यू झाले असताना सुद्धा अहिल्यादेवींनी कधीच खचल्या नाहीत . त्यानंतरसुद्धा त्यांनी उत्तम प्रशासन केले , असल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले. डॉ. शेटे यांनी व्याख्यान सांगताना स्लाईड शोद्वारे चित्रफीत दाखवत सर्वांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गवळी,उत्सव अध्यक्ष अरविंद गवळी,हेमंत पिंगळे,,लहू गायकवाड,शिवदास चटके सर,वामन वाघचौरे , औदुंबर जगताप,बबलू जगताप,शंकर घुले,अरुण घुले,मारुती गांगर्डे,बाळासाहेब घुले,चंद्रकांत पवार,विजय घुले,शाम गांगर्डे,शेखर कवठेकर,ईश्वर अहिरे,ब्रह्मदेव खटके,विष्णू जगताप,संदीप काशीद,प्रशांत भगरे,दादा गांगर्डे,श्रीकांत गणेशकर,बजरंग कदम,सुनिल कदम,बाळासाहेब गवळी,विक्रम पाटील,मछिंद्र शिंदे,लक्ष्मण पवार,सचिन कदम यांच्यासह महिला आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लव्ह जिहाद सारख्या घटनांना मूठमाती देण्याची गरज !
आज मुलं मोबाईल आणि टीव्हीच्या प्रेमात जास्तच पडलेली आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या कथा सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,तरच प्रत्येकाच्या घरात शिवबा जन्माला येतील, असे सांगत डॉ. शेटे यांनी आजकाल मुलींची प्रेमप्रकरणामधून फसवणूक करून होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाऱ्याबाबतच्या विषयालासुद्धा हात घातला.लव्ह जिहाद सारख्या घटना घडणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे ,त्यासाठी पालकांनी दररोज आपल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे ,मुला-मुलींनीसुद्धा आपल्याबरोबर घडत असलेल्या चुकीच्या घटना पालकांना सांगितल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. आईवडिलांच्या मनाविरुद्ध मुलांनी जाऊ नये ,प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये ,असा सल्ला देतानाच प्रत्येक मुलामुलींनी आपल्या घरातील आई आणि वडील,आजी आणि आजोबा तसेच सुनेने सासूला सन्मानाने बोलले पाहिजे,तरच संस्कार टिकून राहतील असे. डॉ. शेटे यांनी सांगितले.