लातूर शहरात मतदार जागृतीसाठी स्वीप कक्षाचा उपक्रम
लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज लातूर शहरात पार पडलेल्या हाके व पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.
श्रीनिवास मंगल कार्यालय येथे उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे यांची कन्या पूजा यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून लातूर जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी नवदाम्पत्यासह लग्न सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याविषयी आवाहन केले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. याप्रसंगी शिक्षक सुनिल हाके यांच्या सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वीप कक्षाचे सदस्य उपस्थित होते.