उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन
आयुष्मान भारत कार्डद्वारे ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत-चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि.११-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत न्यू कोपरे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे येथील नागरिकांसाठी खडकवासला धरण परिसरात तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पार्क, नक्षत्र उद्यान यासह विविध मूलभूत सुविधांचे भूमिपूजन आणि नागरिकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, रमेश कोंडे, सचिन मोरे, सुभाष नाणेकर, गणेश वरपे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाला सुख आणि समाधान मिळावे म्हणून आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा अनेक गरीब कुटुंबांना लाभ झाला आहे. राज्यातही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढविण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.
गरीब आणि गरजू कुटुंबांना ३०० वर्ग फुटांचे घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या जूनपासून राज्यातील ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असेही श्री.पाटील म्हणाले.
ऑक्सिजन पार्कमुळे हवा शुद्ध राहील आणि परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याची सोय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार तापकीर म्हणाले, खडकवासला परिसरात केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. शिवणे ते कोंढवे-धावडे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. परिसरात वाहनांची वर्दळ अधिक असल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी ऑक्सिजन पार्क उभारण्यात येत आहे. नक्षत्र उद्यानात देशी प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.कोंडे, श्री.नाणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.